
रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा सुरू; परंतु परीक्षार्थींना हॉलतिकीटच नाही!
रेल्वे भरती बोर्डाकडून ग्रुप डी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, या परीक्षा १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. मात्र, सोमवारपासून सुरू झालेल्या या परीक्षांसाठीचे हॉलतिकीटच विद्यार्थ्यांना अद्याप उपलब्ध झाले नसून, त्यामुळे परीक्षा द्यायची कशी आणि कुठे याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हॉलतिकीटच उपलब्ध न झाल्याने अर्ज केलेल्या तरुणांना परीक्षेला मुकावे लागणार असल्याने त्यांच्यात प्रचंड रोष पसरला आहे.
रेल्वे भरती बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले आहेत. ६३ हजार पदांसाठी ही भरती होणार असून, रेल्वेच्या या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. मुंबईतून सेंट्रल रेल्वे झोनसाठी २३२१ जागांसाठी या परीक्षा असून, महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, मुंबईसह इतर परीक्षा केंद्रांवर त्या घेण्यात येणार आहेत. यासाठीचे हॉलतिकीट, क्रमांक, सेंटर कोड हे सर्व परीक्षेच्या चार दिवस आधी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार होते. मात्र, हे संकेतस्थळच गेल्या चार दिवसांपासून सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे.