प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार

राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी रात्री जारी केली. शनिवारपासून राज्यभरात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसेच वन फलोत्पादनासाठी, कृषी व घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आले आहे. तर दुधाची पिशवी दुध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांनाच पुन्हा खरेदी कराव्या लागतील.

राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक तसेच थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार दुधासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र या पिशव्यांची पुनर्प्रक्रिया -पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनाच ५० पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. या पिशव्या दूध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांना पुनर्खरेदी करणे बंधनकारक असेल. ग्राहकाने दुधाची रिकामी पिशवी केल्यावर ग्राहकाला ते पैसे परत मिळतील.
तसेच एक आणि अर्धा लीटरच्या प्लास्टिक बाटलीसाठीही एक आणि दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. दुकानदार आणि विक्रेते यांना या बाटलीची पुर्नखरेदी करणे बंधनकारक असेल. बॉटल परत केल्यावर ग्राहकांना एक आणि दोन रुपये परत मिळतील. मात्र, जर ग्राहकाने दुधाची पिशवी व प्लास्टिक बॉटल परत केली नाही, तर त्यांचे पैसे वाया जाणार आहेत.

प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त २५ हजार आणि तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा होईल अशी कायद्यात तरतूद करण्यात आली असून दर तीन महिन्यानी या बंदीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात येणार आहे.

थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या ताट, कप, प्लेट्स, ग्लास, काटेचमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलेन बॅग, स्प्रेड शीट्स, पाऊच, वेष्टन यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री तसेच आयात व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

औषधांच्या वेष्टनासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, वन आणि फलोत्पादन, कृषी, घनकचरा हाताळणी आदी कारणांसाठी लागणाऱ्या तसेच रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक आच्छादने (शिट्स्) यांना बंदीतून सूट. मात्र या उत्पादनांवर त्यांच्या वापराची माहिती ठळकपणे नोंदवणे आवश्यक असेल. (सौजन्य: लोकसत्ता)

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online