
आंतरजातीय विवाह केला म्हणून तेलंगणात बापानेच तोडले मुलीचे हात
तेलंगणच्या नलगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून, जावई या हल्ल्यात जखमी झाला आहे. हल्ला होत असताना ही मुलगी “नाना थांबा… नका मारू मला…’ अशी विनवणी करत होती.
हैदराबादच्या मध्यवर्ती भागात काल दुपारी ही घटना घडली. बंजारा हिल्स पोलिसांनी मुलीचे वडील मनोहर चारी (वय 42) याला त्याचदिवशी सायंकाळी अटक केली. माधवी चारी (वय 20) हिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बी. संदीपबरोबर (वय 22) विवाह केला. गेल्या पाच वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. संदीप हा दलित असल्याने मनोहर चारी यांना हा विवाह मान्य नव्हता. या रागातून त्यांनी या नवविवाहित जोडप्यावर हल्ला केला.
माधवी व संदीपने 12 सप्टेंबरला कोणालाही कळू न देता बोलारम येथे विवाह केला होता. काल दुपारी मनोहर यांनी मुलीला फोन करून आपल्याला तुमचा विवाहाचा निर्णय मान्य असल्याचे सांगून दोघांना बोलावून घेतले. माधवीने वडिलांवर विश्वास ठेवून संदीपसोबत दुचाकीवरून गोकुळ थिएटर येथे पोहोचले. रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते वडिलांची वाट पाहत होते. दुपारी 3.15 च्या सुमारास मनोहर तेथे पोहोचला आणि जवळ येताच त्याने कोयता बाहेर काढला व संदीपवर वार करायला सुरवात केली. संदीपने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने कोयत्याने वार करून माधवीचे हात तोडले. या वेळी माधवी “नाना थांबा… नका मारू मला…’ असा आक्रोश करत करून हातापाया पडत होती. परंतु, दारूच्या नशेत असलेला मनोहर ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.