राज्यातील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत नवीन ७० हजार जागा वाढणार

कोल्हापूर- पश्‍चिम महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी किमान एक ते दीड लाख प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा भासत असल्याने उत्पादनक्षमतेवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत कुशल मनुष्यबळ विकासाला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेश क्षमता ७० हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांत सरासरी एक ते दीड हजारांवर जागा वाढणार आहेत. यातून तेवढेच कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाची उणीव भरून निघण्यास मदत होईल. ऑटोमोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, प्लास्टिक, इलेक्‍ट्रिकल, प्लंबिंग, पायाभूत सुविधा, आयटी इंडस्ट्रीपर्यंत लागणारे कारागीर, तसेच बांधकाम क्षेत्रात कारागिरांची आवश्‍यकता मोठ्या प्रमाणात भासते. कोल्हापुरात शिरोली, कागल पंचतारांकित, गोकूळ शिरगाव व शिवाजी उद्यमनगर भागात कारखान्यांची संख्या मोठी आहे. येथे काम करण्यास प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नसल्याने अनेकदा अल्पशिक्षित कामगार घेऊन कारखाने चालविण्याची वेळ कारखानदारांवर येते. अशा कारखान्यांकडून कुशल मनुष्यबळाची मागणी आयटीआयकडे केली जाते. थोड्याफार फरकाने अशी स्थिती राज्यभर आहे.

गेल्या दहा वर्षांपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तालुकास्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. दरवर्षी राज्यभरात १ लाख ३४ हजार प्रवेश औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत होतात. त्यासाठी जवळपास ४ लाखांवर अर्ज येतात. यात गुणवत्तेनुसार विविध ट्रेडना प्रवेश दिला जातो. एकूण अर्जांतील अवघ्या तीस टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, उर्वरित विद्यार्थ्यांची निराशा होते. अनेकदा असे विद्यार्थी शिक्षण प्रवाहातूनही बाहेर पडण्याची शक्‍यता वाढते.

अशात औद्योगिक विकासासाठी सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणून कुशल मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. वर्षाकाठी कोल्हापुरात किमान ४० हजारांवर कुशल मनुष्यबळाची गरज आहे. असे असताना आयटीआयमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम ३ ते ४ हजार आहेत. आयटीआय प्रशिक्षणानंतर ८५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो. त्यातील ६० टक्के विद्यार्थी बाहेरगावी नोकरीसाठी जातात. त्यामुळे स्थानिक गरजही भागत नसल्याची बाब विचारात घेता रोजगार अनेकांना मिळावा यासाठी राज्यातील आयटीआयमध्ये एकूण ७० हजार जागा वाढविल्या जातील. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेकडे सर्व मिळून किमान एक हजार जागा वाढण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थी जागा वाढविल्यानंतर ट्रेडनुसार प्रशिक्षकही भरावे लागणार आहेत. त्यासाठी सध्या जवळपास राज्यभरात दोन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. या जागांवर भरती व प्रत्येक विभागनिहाय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रसामग्रीही अद्ययावत करण्यात येणार आहे. (सौजन्य: दैनिक सकाळ)

You might also like
.
Comments
Loading...