
गुंगीचे औषध देऊन कोकण रेल्वेप्रवाशांची लूट करणारी टोळी पकडली
रेल्वे प्रवासादरम्यान सहप्रवाशांनी दिलेले खाद्यपदार्थ खाण्यामुळे लूट होण्याची शक्यता असल्याबाबत सातत्याने जनजागृती केली जात असली, तरी अद्याप अशाप्रकारे लूट करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून कोकण रेल्वेमार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका टोळीला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेकडून अटक केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, कोकणमार्गे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राज्यात मेल-एक्सप्रेसने जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा विश्वास संपादन करून ही टोळी लूट करत होती. आरोपींनी कल्याण स्थानकात तिकीट काढल्याचे समोर आल्यानंतर त्याआधारे आरोपींना अटक केली आहे.